गोंदिया (वृत्तसंस्था) भंडारा येथून सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गोंदियाकडे जात असलेल्या शिवशाही बसला मोठा अपघात झाला. त्यात ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघाताची दखल राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून मृतांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपये व जखमींचे सर्व उपचार शासनातर्फे करण्याचे निर्देश दिले आहेत.
होती. त्या गाडीत चालक प्रणय रायपूरकर व वाहक नितीन मते होते. बस कोहमारा गोंदिया मार्गावरील खजरी डव्वा गावाजवळील वळणावरील पुलाजवळ पोहोचली, त्यावेळी समोरून आलेल्या मोटारसायकलस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस उलटून पुलाच्या कठड्याला धडकली. या बसमधील काही प्रवासी खाली पडले आणि त्यांच्या अंगावरच बस उलटली. त्यामुळे ११ प्रवासी जागेवरच मृत पावले.
अपघात होताच बसमधून प्रवाशांच्या किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या, तेव्हा आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. मात्र, बस उचलण्याकरता आलेली क्रेन बसचे वजन जास्त असल्याने बसला उचलू शकली नाही. मोठी क्रेन येण्यास बराच वेळ लागला, याचदरम्यान पोलीस प्रशासन व रुग्णवाहिका येथे पोहोचले व नागरिकांच्या मदतीने जखमींना गोंदिया येथे उपचाराकरता रवाना करण्यात आले.
या अपघातात गोंदिया पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेली स्मिता सूर्यवंशी हिचाही मृत्यू झाला. ही माहिती पोलीस विभागात मिळताच संपूर्ण गोंदिया जिल्हा पोलिसांमध्ये दुःखाचे वातावरण पसरले. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या इतिहासात कदाचित हा सर्वात मोठा अपघात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मृतांची नावे
१) स्मिता विक्की सूर्यवंशी (३२, रा. अर्जुनी/मो., जि. गोंदिया) २) मंगला राजेश लांजेवार (रा. पिंपरी, जि. भंडारा) ३) राजेश देवराम लांजेवार (रा. पिंपरी, जि. भंडारा) ४) कल्पना रविशंकर वानखेडे (६५, रा. वरोरा, जि. चंद्रपूर) ५) रामचंद्र कनोजे (६५, रा. चांदोरी, ता. साकोली, जि. भंडारा) ६) अंजिरा रामचंद्र कनोजे (६५, रा. चांदोरी, ता. साकोली, जि. भंडारा) ७) आरिफा अजहर सय्यद (४२, रा. घोटी, ता. गोरेगाव, जि. गोंदिया) ८) नयना विशाल मिटकर (३५, रा. बेसा, नागपूर)