जळगाव -धरणगाव (प्रतिनिधी) : शासनाच्या अतिशय महत्वाकांक्षी अशा जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील १५ गावांच्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळाली असून यासाठी १२ कोटी ११ लक्ष रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. धरणगाव तालुक्यातील साळवे, तरडे, चिंचपुरे , निशाणे, लाडली, कंडारी व जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी , करंज , कुऱ्हाडदे , रिधुर, वाकडी, घार्डी व लमांजन येथे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने आता या सर्व गावांमधील पाणीपुरवठा योजनांचा मार्ग मोकळा झाला आहे.
जलजीवन मिशन ही योजना राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नांमधून राबविण्यात येत आहे. याच्या अंतर्गत देशातील प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे शुध्द पाणी पुरवठा करण्याचा संकल्प घेण्यात आला आहे. यात आधीचे निकष बदलून दरडोई ५५ लीटर या निकषाने पाणी पुरवठा करण्यात येत असून यामध्ये गुरांसाठी लागणार्या पाण्याचाही समावेश करण्यात आलेला आहे. ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी कालच ८९ गावांच्या पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून यासाठी ५८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये जळगाव तालुक्यातील करंज – ४८ , रामदेववाडी – २ कोटी , कुऱ्हाडदे – ६५ लक्ष, रिधूर – ६० लक्ष, वाकडी – ७५ लक्ष , घार्डी – ३६ लक्ष , लमांजन प्र.बो – ४६ लक्ष ; यासोबत धरणगाव तालुक्यातील निशाणे खुर्द – ५१ लक्ष , लाडली – ४६ लक्ष , तरडे खुर्द – १ कोटी ९८ लक्ष , चिंचपुरे बुद्रुक – १ कोटी ९३ लक्ष , कंडारी बुद्रुक – ५१ लक्ष , साळवे – ४ कोटी ३२ लक्ष , फुलपाट – २० लक्ष आणि दहिदुले – ४४ लक्ष या गावांच्या योजनांना मंजुरी मिळाली आहे. यासाठी एकूण १२ कोटी ११ लक्ष रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.
या योजनांमध्ये जलस्त्रोतापासून ते जलकुंभापर्यंत पाणी आणण्याची, जलकुंभात साठवण्याची आणि तेथून नळांच्या माध्यमातून थेट घरापर्यंत पाणी पोहचवण्याची प्रणाली उभारण्यात येणार आहे. यातील साळवे गावाचा विचार केला असता पाणी पुरवठा योजनेत इंटेक्स विहीर;. निरीक्षण विहीर;. जॅकवेल व पंप हाऊस;.अशुद्ध पाण्याची पंपिंग मशनरी; २७.५० एचपी क्षमतेचा पंप; अशुद्ध पाण्याची उर्ध्ववाहिनी १६० मिलिमीटर व्यासाची ८४११ मीटर लांबी; १.० एम एल डी क्षमतेचा पॅकेज ट्रीटमेंट प्लांट; १० एचपी चे शुद्ध पाण्याची पंपिंग मशिनरी; ११० मिलिमीटर व्यासाची ७५५ मीटर लांबीची शुद्ध पाण्याची उर्ध्व वाहिनी; एक लाख लिटर क्षमतेचे दोन जलकुंभ तसेच ३०००० लिटर क्षमतेचा एक जलकुंभ आणि गावातील वितरण व्यवस्था या माध्यमातून ग्रामस्थांना शुध्द जल पुरवठा होणार आहे. तर कंडारी बुद्रुक गावाती योजनेत अस्तित्वातील विहिरीचे खोलीकरण व इतर कामे; स्वीच रूम ; पंपिंग मशिनरी;११० मिलिमीटर व्यासाची ५२०मीटर लांब उर्ध्ववाहिनी;.७८००० लिटर क्षमतेचा जलकुंभ;. वाढीव वितरण व्यवस्था तसेच. विद्युत कनेक्शन व इतर कामे आदींचा समावेश असून अश्याच प्रकारे इतर गावांसाठी कामांचा समावेश आहे.
ना. गुलाबराव पाटील यांनी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून राज्यभरात जलजीवन मिशन योजनेला वेग दिला असतांना त्यांच्या स्वत:च्या मतदारसंघात देखील जोरदार गतीने या योजनेच्या माध्यमातून विविध गावांसाठी पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळत असल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे. या सर्व गावांमधील योजनांचे प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होणार असून तेथील गावांमधील पाणीपुरवठा योजनांचा मार्ग मोकळा झाला आहे.