कोल्हापूर (वृत्तसंस्था) राज्यपाल नियूक्त १२ सदस्यांच्या निवडीसाठीचा प्रस्ताव राज्य सरकार आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवणार आहे. मात्र ही १२ नावांना राज्यपाल नकार देणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना फोन केला असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राज्यपाल नियुक्त आमदारांची सरकारकडून येणारी नावे बाजूला ठेवणार आहेत, असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
“कोल्हापूर जिल्ह्याचे माजी मंत्री विनय कोरे यांच्या मातोश्री यांचे निधन झाले होते. त्यांचे सांत्वन करण्यासाठी भैयासाहेब माने, बँकेचे संचालक आदी मंडळी गेली होती. त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तिथे पोहचले. त्यावेळी माझे आणि देवेंद्र फडणवीस यांचे बोलणे झाले. फडणवीसांनी मला राज्यपालांशी बोलणे झाले. राज्य सरकारने दिलेली राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी बाजूला काढून ठेवणार असे ठरले आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले,” असा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे. त्यामुळे आता राज्यपाल १२ सदस्यांच्या नावांना नकार देताना कोणत्या त्रुटी काढतात आणि त्यावर काय उत्तर द्यायचे ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे ठरवतील. राज्यपालांचे वागणे हे असंवैधानिक असून तांत्रिक अडथळे आणल्यास कोर्टात जाऊ, असे हसन मुश्रीफ म्हणाले.