धुळे (प्रतिनिधी) खान्देशातून दुचाकी लांबवणार्या अट्टल चोरट्यांना धुळे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरट्यांनी जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून दुचाकी चोरींची कबुली दिली आहे तर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी दिली.
दुचाकी चोरीच्या तपासात टोळी उघड !
उंटावद, ता.शिरपूर येथील रवींद्र सुकलाल पारधी यांची दुचाकी (एम.एच.18 ए.यु.1509) ही हिसाळे गावाच्या बस स्थानकावरून लांबवण्यात आली. थाळनेर पोलिसात दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना सागर शामभाऊ मालचे (20), विजय उदय मालचे, आनंद रघुनाथ मोरे, इकबाल हैदर पिंजारी (सर्व रा.वालखेडा, ता.शिंदखेडा) यांच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिल्यानंतर संशयिताना गोराणे फाटा येथून विजय मालचे व आनंद मोरे यांना ताब्यात घेतले. या चोरट्यांकडून शहादा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीस दिलेली दुचाकी जप्त करण्यात आली तसेच त्यांनी अन्य पाच दुचाकी त्यांच्या घराजवळून देखील काढून दिल्या तर आरोपींचा साथीदार ईकबाल पिंजारी यांच्या घराजवळून अन्य पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. या प्रकरणात देखील अमळनेर, मालेगाव छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून चोरट्यांनी शिरपूर तालुक्यातील नागेश्वर येथून चोरी केलेली अन्य दुचाकी त्यांचा मित्र अमर पावरा याला विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार ही दुचाकी जप्त करण्यात आली.
चोरीच्या 12 दुचाकी जप्त !
अटकेतील चोरट्यांनी 12 दुचाकी काढून दिल्या असून त्यातील सहा गुन्हे उघडकीस आले आहेत तर सहा दुचाकींची चोरी संदर्भात माहिती गोळा करणे सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धीवरे यांनी दिली.
यांनी आवळल्या मुसक्या !
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांचय मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, बाळासाहेब सुर्यवंशी, अमरजित मोरे, संजय पाटील, संतोष हिरे, पंकज खैरमोडे, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, चेतन बोरसे, प्रशांत चौधरी, महेंद्र सपकाळ, जितेंद्र बाघ, हर्षल चौधरी, योगेश जगताप, किशोर पाटील, कैलास महाजन, चालक राजू गीते आदींच्या पथकाने केली.