बंगळुरू (वृत्तसंस्था) कोरोनापुढे देशात हतबलता दिसून येत आहे. कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. आता कर्नाटक सरकारनेही लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून (२७ एप्रिल) १४ दिवसांचा लॉकडाऊन राज्यात असणार आहे. उद्या रात्रीपासून निर्बंध लागू होणार आहेत.
मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे, राज्यात दिल्ली आणि महाराष्ट्रापेक्षाही वेगानं कोरोना संक्रमण फैलावत आहे. त्यामुळे राज्यात १४ दिवसांसाठी ‘कर्फ्यू’ लावण्यात येत आहे. कर्नाटकात दिवस-रात्र लागणारा या कर्फ्यूला उद्या रात्रीपासून सुरूवात होणार आहे. या कडक निर्बंधांदरम्यान केवळ अत्यावश्यक सेवांना सूट दिली जाणार आहे. किराणा आणि आवश्यक वस्तूंची दुकानंही केवळ चार उघडण्याची परवानगी देण्यात आलीय. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर खुलं राहील मात्र गारमेन्ट आणि कन्स्ट्रक्शन सेक्टर बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन निर्बंधाची कठोरता स्थानिक अधिकाऱ्यांच्या हातात सोपवण्यात आलीय.
मुख्यमंत्र्यांनी या निर्बंधांसोबतच आणखी एक घोषणा केलीय. यानुसार, राज्यात १ मेपासून १८ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींना सरकारी रुग्णालयांत मोफत लस दिली जाणार आहे. ४५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी अगोदरपासूनच मोफत लसीकरण मोहीम सुरू आहे.
कर्नाटकात दररोज १० हजारांहून अधिक रुग्नांची नोंद केली जात आहे. कर्नाटकात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही २.६२ लाखांवर पोहचलीय. अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत कर्नाटक हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रभावित राज्य ठरलंय. कोरोनामुळे राज्यात एव्हाना १४ हजारांहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.