मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे १४ खासदार हे आमच्या संपर्कात असल्याचे, असा दावा भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केला आहे. योग्यवेळी ते आम्ही जाहीर करू, असा गौप्यस्फोट करतानाच शिवसेनेचे 24-25 आमदार नाराज असल्याचा दावाही भाजपचे आमदार प्रसाद लाड (prasad lad) यांनी केला आहे.
मीडियाशी संवाद साधताना प्रसाद लाड यांनी हा गौप्यस्फोट केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात म्हणाले की, तळमळतंय, जळमळतंय. मात्र, आता त्यांनाच आपल्या पक्षातील खासदारांची तळमळ, जळजळ दूर करता आली नाही. मात्र, त्याचं चूर्ण आमच्याकडे आहे आणि आम्ही ते योग्यवेळी देऊ, असं टोलाही लाड यांनी लगावला आहे.
शिवसेना नेत्यांना पालकमंत्री दाद देत नाहीत. हे आता उघड झालं आहे. त्यामुळे त्यांच्या मनातील मळमळ दिसून येत आहे, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली. मशिदीवरील भोंग्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेचंही त्यांनी स्वागत केलं. राज ठाकरे यांच्या या भूमिकेचं मी स्वागत करतो. बाळासाहेब ठाकरे यांनी भोंगे आणि अजना संदर्भात जी भूमिका जाहीर केली होती. शिवसेनेची ती भूमिका आता बदलली आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खुद्द जाहीर करणार आहेत का?, असा सवाल प्रसाद लाड यांनी केला.