मुंबई (वृत्तसंस्था) ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा आहाकार लक्षात घेऊन खबरदारी म्हणून राज्यात उद्या पासून रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. राज्यात कोरोना आणि कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी वर्षावर तातडीची बैठक बोलावली होती. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू केली. ५ जानेवारीपर्यंत ही संचारबंदी असणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले. ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत असून या विषाणुची घातकता पुढील काही दिवसात कळेल त्यामुळे आजपासूनच राज्यात यासंदर्भात अधिकची सतर्कता बाळगली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना आजपासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाइन बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाइन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. त्यांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. ज्या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमाने उतरतात तेथील महापालिका आयुक्तांनी अशा प्रवाशांना क्वारंटाइन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पिटलची व्यवस्था करावी. त्याचबरोबर युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची देखील व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.