नवी दिल्ली वृत्तसंस्था । संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. दरम्यान, आज कामकाज सुरू होण्यापूर्वी आलेल्या अहवालानुसार लोकसभेच्या तब्बल 17 खासदारांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे सद्या सभागृहांचे कामकाज रोज चारच तास चालणार आहे.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उपचारांसाठी शनिवारी अमेरिकेला रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधी हेही गेले असल्याने दोन्ही नेते काही दिवस लोकसभेत नसतील. त्यामुळे लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांची जबाबदारी वाढली आहे. तर, अधिवेशनाच्या अगोदर सर्वच खासदारांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये लोकसभा सभागृहातील 17 खासदारांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. कोरोनाबाधित झालेल्या खासदारांमध्ये सर्वाधिक भाजपाचे खासदार असून त्यांची संख्या बारा आहे. वायएसआर काँग्रेसच्या 2, शिवसेना, डीएमके आणि आरएलपी पक्षाच्या प्रत्येकी एक खासदारास कोरोनाची लागण झाली आहे. आज सकाळी या सर्वच खासदारांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने संसद परिसरात कोरोनाची चर्चाही चांगलीच रंगली आहे.