मुंबई (वृत्तसंस्था) रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. १७ वर्षीय या पीडित तरुणीला आरोपी हे सतत धमकी देऊन बलात्कार करत होते. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे तर तीन जण फरार आहेत. या अमानुष घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी वाशी परिसरात आपल्या पालकांसोबत रहायची. याच भागात राहणारे काही तरुण गेल्या काही दिवसांपासून या तरुणीला सतत धमकवायचे. सर्वात आधी दोन मित्रांनी या तरुणीवर शारिरिक अत्याचार केले. याबद्दलची माहिती जेव्हा त्यांच्या इतर मित्रांना समजली, तेव्हा त्या नराधमांनीही परिस्थितीचा फायदा घ्यायचं ठरवलं.
आरोपींनी पीडित मुलीला जिवे मारायची धमकी देत तिच्यावर आळीपाळीने सामुहीक बलात्कार केला. पीडित मुलीने या घटनेची माहिती पालकांना दिली असता त्यांनी वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ज्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ७ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात तीन फरार आरोपींचा शोध सुरु आहे. तसेच घटनेचं गांभीर्य पाहता या घटनेत आणखी काही तरुण सहभागी असल्याचा पोलिसांना अंदाज आहे. या दृष्टीकोनातून वडखळ पोलीस घटनेचा तपास करत आहेत.