धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नांदेड येथील शेतकरी रमाकांत रामदास इंगळे यांच्या साळवा व नारणे रस्त्याला लागून असलेल्या शेतातून लाखो रुपये किंमतीच्या एस. के .ब्रॉण्ड नाव छापलेल्या १७५ तयार हरबऱ्याच्या गोण्या अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी (दि. १) च्या रात्री लांबवील्या घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या एका दिवसात गुन्ह्याची उकल करत मुद्देमालही ताब्यात घेतला आहे.
नांदेड येथील शेतकरी रमाकांत इंगळे यांनी काही शेतकऱ्यांची शेती जूप पद्धतीने कसायला घेतली होती. त्यात शेतीत त्यांनी अकोला येथील हिंमत कंपनीचे प्लाटसाठीचे बियाणे हरबऱ्याच्या वाणाची पेरणी केलेली होती. काढून तयार झालेला मालाचा त्यांनी साळवा रस्त्याला लागून असलेल्या शेतात ढिग मारला होता.
शुक्रवारी सायंकाळीच त्यांनी हरबऱ्याच्या गोण्या भरुन ठेवल्या होत्या. रात्री अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने भरलेल्या गोण्या झाकून ते घरी निघून गेले. याच संधीचा फायदा चोरट्यांनी साधून रात्री तीन पिकअप मालवाहू वाहनाद्वारे १७५ हरबऱ्याच्या गोण्या लांबवील्या. घटनास्थळापासून काही अंतरावर दोन गोण्या आढळून आल्या. तसेच जवळच्या शेतात पीकअप वाहनांच्या टायरचे माग दिसून येत होते. हा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली होती.
रमाकांत इंगळे यांनी पोलीस स्टेशन गाठत पोलीसांना माहीती दिली. दरम्यान, निमगव्हाण गावालगतच्या तापी पुलाजवळ हरबऱ्याच्या गोण्यांनी भरलेली पीकअप पोलीसांनी पडकली. तर पुढील तपासासाठी उपनिरीक्षक संतोष पवार व पोलीस पथक ग्रामस्थांसह मध्यप्रदेशाकडे रवाना झाले. तसेच एक पिकअप मध्य प्रदेशातील शेंधवा येथून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळते.
दरम्यान, धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उद्वव ढमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार यांच्या पोलीस पथकाने नांदेड ग्रामस्थांच्या मदतीने या गुन्ह्याचा अवघ्या एका दिवसात शोध लावला आहे. चोरी करणाऱ्या संशयितांची संपूर्ण माहिती देखील पोलिसांना मिळाली असल्याचे कळते.