नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संसदेवरील दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या शौर्य आणि बलिदानाचे स्मरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदींनी दिलेल्या संदेशात म्हटलंय की, “या भ्याड हल्ल्याला आम्ही कधीही विसरणार नाही. या हल्ल्यात संसदेचं रक्षण करताना शहीद झालेल्या लोकांचं आम्ही स्मरण करतो. भारत नेहमीच त्यांचा ऋणी राहील.” संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला आज १९ वर्षे पूर्ण झाली आहेत.
आजपासून १९ वर्षापूर्वी, १३ डिसेंबर २००१ रोजी नवी दिल्लीमध्ये ‘न भूतो न भविष्यति’ अशी घटना घडली. अंगाचा थरकाप उडविणा-या या घटनेत भारतातील संसेदवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. भारताच्या लोकतंत्राचे मंदिर समजल्या जाणा-या संसदेत झालेला हा हल्ला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जवानांचा मृत्यू हा संपूर्ण देशासाठी धक्कादायक बाब होती. या संपूर्ण अतिरेकी कारवाईचा मास्टर माईंड अफजल गुरु या अतिरेक्याला १५ डिसेंबर २००१ मध्ये जम्मू-काश्मीर येथून अटक करण्यात आली. हा हल्ला भारतीय संविधानाला धक्का पोहोचविणारा होता. या हल्ल्यात ५ दिल्ली पोलीसचे जवान, २ संसदेचे सेक्युरिटी गार्ड शहीद झाले होते. दहशतवाद्यांनी संसदेवर केलेल्या या हल्ल्यावेळी संसदेत तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्ष नेत्या सोनिया गांधी यांच्यासह अनेक खासदार उपस्थित होते. त्यावेळी संसदेचं हिवाळी अधिवेश सुरु होतं. संसदेवर हल्ला करणारे दहशतवादी पांढऱ्या रंगाच्या अॅंम्बेसिडरमधून आले होते. त्यांनी संसदेच्या आवारातील सुरक्षा दलांवर अचानक फायरिंग सुरु केली. त्यानंतर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी त्या पाचही दहशतवाद्यांना ठार केलं.