बोदवड (प्रतिनिधी) कापूस तसेच तूर विकून आलेले २ लाख १६ हजार रुपये बँकेतून काढून घरी नेत असताना दोन भामट्यांनी शेतकऱ्याची ही रक्कम लांबवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रभाकर धर्मा लुटे (वय ५९, रा. राजूर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
प्रभाकर लुटे यांनी कापूस आणि तूर विकून जे पैसे मिळाले होते ते बुधवारी सकाळी स्टेट बैंकेतून काढले. मजुरांना पैसे देण्यासाठी तसेच इतर कारणांसाठी त्यांनी ही रक्कम काढली होती. त्यानंतर पैसे घेऊन दुचाकी क्रमांक (एम.एच. १९ इ. बी. ७५०७) ने राजूरला जाण्यासाठी निघाले. मलकापूर रस्त्यावर गॅस एजन्सीजवळ आले असता त्यांच्या दुचाकीसमोर एका दुचाकीवरून अंदाजे ३० वयोगटातील दोन तरुण आले. त्यांनी तुमच्या पिशवीतील पैसे खाली पडत आहेत, असे सांगून त्यांचे लक्ष विचलित केले आणि मोटरसायकलच्या हैंडलवर लकटवलेली पिशवी हिसकावून हे चोरटे पसार झाले. या पिशवीत स्टेट बैंकेने पासबुक व रोख २ लाख १६ हजारांची रक्कम होती. लुटे यांना काही कळण्याच्या आतच हा प्रकार घडला. घटनेनंतर लुटे यांनी बोदवड पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली असून, बोदवड पोलिसांनी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असून पो.ना प्रमोद तायडे हे पुढील तपास करत आहेत.