श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू- काश्मिरमधील दहशतवादी हल्ले रोखण्यात मोदी सरकार अपयशी ठरले असून त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात उलट दहशतवाद वाढल्याचा आरोप काँग्रेसने शनिवारी केला. मोदींचा तिसरा कार्यकाळ सुरू झाल्यापासून ९८ दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये २५ दहशतवादी हल्ले झाल्याचे काँग्रेसने म्हटले.
केंद्रशासित जम्मू- काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. ऑगस्ट २०१९ नंतर जम्मू- काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होण्याचे मोठे आश्वासन देण्यात आले होते. आपल्याला २०१४ तथा २०१९ सालानंतर बोलायचे नाही. पण मोदींनी तिसऱ्या कार्यकाळाची शपथ घेऊन ९८ दिवस झाले आहेत. या काळात जम्मू-काश्मिरात २५ दहशतवादी हल्ले झाले. यात २१ जवान शहीद तर २८ जण जखमी झाले. या हल्ल्यात १५ नागरिकांचाही मृत्यू झाला तर ४७ जण जखमी झाले. या सगळ्यांचे उत्तर कोण देईल? असा प्रश्न श्रीनेत यांनी उपस्थित केला. जम्मूत शांतता होती. तेथील दहशतवाद संपुष्टात आला होता. परंतु आता पुन्हा जम्मूच्या डोडा, रियासी आणि अन्य भागात दहशतवादी हल्ले वाढल्याचे दिसत असल्याचे श्रीनेत म्हणाल्या. त्यांनी जम्मूच्या किश्तवाड जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवादी चकमकीत शहीद झालेल्या दोन जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसेच पंतप्रधान २०१९ पासून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहत नसल्याचा आरोप लावला. पंतप्रधान लहान-लहान गोष्टींवर
ट्विट करतात. दौरे करण्यासाठी जगाच्या नकाशावर नवीन-नवीन देशांचा शोध घेतात.
लोकांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. परंतु २०१९ सालापासून त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली देणे बंद केले आहे.
पंतप्रधानांच्या मीडिया आणि सोशल माध्यम खात्यावर ही बाब पाहता येऊ शकते, असा दावा श्रीनेत यांनी केला. जम्मू-काश्मीरमध्ये सर्व काही ठीक असल्याचे जगाला भासविण्यासाठी मोदींनी असे केले असल्याचा आरोप देखील त्यांनी लावला.