गडचिरोली (वृत्तसंस्था) गडचिरोली पोलिसांच्या नक्षलवाद विरोधी कारवाईला मोठं यश आलं आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तब्बल २६ नक्षलवादी ठार झाले आहेत. विशेष म्हणजे या कारवाईत मोस्ट वॉन्टेड माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे देखील ठार झालाय. ठार झालेल्या २६ नक्षलवाद्यांचे मृतदेह घेऊन जवान गडचिरोली मुख्यालयात परतले असून, ऑपरेशन यशस्वी करणाऱ्या पथकाचे सहकारी जवानांनी स्वागत केले.
मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये मिलिंद तेलतुंबडे उर्फ दीपक उर्फ जीवा याच्यावर ५० लाख रुपयांचे बक्षीस होते. तो नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य होता. याशिवाय १६ लाख रुपयांचे बक्षीस महेश उर्फ शिवाजी गोटा याचाही समावेश आहे. हा नक्षलवादी छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील जगरगुंडा येथील रहिवासी होता. लोकेश उर्फ मंगू पोदायम कंपनी कमांडर ४ याला ठार करण्यातही जवानांना यश आले आहे. या नक्षलवाद्यावर सरकारने २० लाखांचे बक्षीस ठेवले होते. अन्य मारल्या गेलेल्या माओवाद्यांवर ४, ६ आणि ८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
गडचिरोलीत चकमकीत जवानांनी २६ नक्षलवादी मारले. त्यापैकी ७ माओवादी बस्तरमधील आहेत. सर्वांवर ४६ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. लोकेशवर सर्वाधिक २० लाखांचे बक्षीस होते. लच्छू आणि कोसा यांच्यावर प्रत्येकी ४ लाख, किसन उर्फ जयमन आणि सन्नू यांच्यावर ८-८ लाख रुपयांचे बक्षीस होते. चेतनवर दोन लाखांचे बक्षीस होते. यामध्ये एक महिला माओवादी असून, तिचा इतिहास तपासला जात आहे. घटनास्थळावरून जवानांनी ५ एके-४७, ९ SLR, १ इन्सास, ३ थ्री नॉट थ्री, ९ बारा बोरच्या बंदुकांसह १ पिस्तुल जप्त केले आहे. इतर सामनांसह एकूण २९ शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.















