नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोना संसर्ग अद्यापही कायम आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात २६ हजार ३८२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर, ३८७ रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच याच कालावधीत देशात ३३ हजार ८१३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मात्र असे असले तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडताना दिसत आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ९९ लाख ३२ हजार ५४८ वर पोहचली आहे. सद्यस्थितीस देशात ३ लाख ३२ हजार २ एवढे अॅक्टिव्ह केसेस असून, ९४ लाख ५६ हजार ४४९ जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे. तर आतापर्यंत १ लाख ४४ हजार ९६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे. महाराष्ट्रात मंगळवारी ३४४२ लोक संक्रमित आढळले. ४३९५ लोक बरे झाले आणि ७० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १८ लाख ८६ हजार ८०७ लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये ७१ हजार ३५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १७ लाख ६६ हजार १० रुग्ण बरे झाले आहेत. संक्रमणामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या आता ४८ हजार ३३९ झाली आहे. दरम्यान, कोरोना चाचणीच्या दरांमध्ये राज्यशासनाने पुन्हा एकदा कपात केली आहे. आता करोना चाचणीचा दर हा ९८० ऐवजी ७८० रुपये इतका असणार आहे. विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही काल माहिती दिली. राज्यात कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसला तरीही नव्या रुग्णांची संख्या कमी होते आहे. ही बाब निश्चितच दिलासादायक आहे मात्र अजूनही नागरिकांनी खबरदारी घेणं आवश्यक आहे असंही राजेश टोपे यांनी यावेळी स्पष्ट केलं.