जळगाव (प्रतिनिधी) – ‘कुठलाही इतिहास हा शौर्य, पराक्रम, कठिणातून कठिण प्रसंगातही ध्येय कसे साधायचे, आपल्या जवळ जे आहे त्या संसाधनांमध्ये विजयश्री कशी मिळवावी हे शिकवतो. त्याकडे बघण्याची दृष्टी मात्र तशी पाहिजे.’ लेखन, ग्रंथ, गड, किल्ले, बुरुज, मंदिर हे इतिहासात घडलेल्या गोष्टी, घटनांचे आज ही साक्षीदार आहेत. ह्याच इतिहासात गुलामगिरीला झुगारून जनतेच्या प्रती असलेल्या आस्थेमुळे स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपतींचे स्वप्नपूर्तीसाठी अहोरात्र हालअपेष्टा सहन करून स्वराज्यावरील प्रत्येक आक्रमणाला तोडीसतोड उत्तर देणारे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या शुर पराक्रमांची कहाणी ऐकली, बघितली तर आजही प्रेरणा मिळत असते. या प्रेरणेतूनच स्वराज्य रक्षक आदर्श समाज घडावा, यासाठी शाळकरी मुलांना इतिहासातील बारकावे लक्षात यावे या हेतूने जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन यांनी अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी ‘छावा’ चित्रपट बघण्याची संधी उपलब्ध करून दिली. स्टार मल्टिप्लेस या अत्याधुनिक चित्रपट गृहामध्ये ‘छावा’ चित्रपटाची अनुभूतीच्या इयत्ता ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी घेतली. शिक्षक, शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थी असे एकून २६७ जणांनी एकाच वेळी तीन स्क्रीन वर छावा चित्रपट बघितला. यासाठी प्राचार्या रश्मी लाहोटी, जनसंपर्क अधिकारी मनोज दाडकर, रूपाली वाघ यांच्यासह सर्व शिक्षकवृदांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
‘श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी गरिब मुलांना उच्च प्रतिचे इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे या हेतूने अनुभूती स्कूल सुरू केली. महाराष्ट्रात अनेक वीर योद्धा होऊन गेले त्यांचा खरा इतिहास विद्यार्थ्यांना समजावा यासाठी जेणे करून त्यांना प्रेरणा मिळेल यासाठी विद्यार्थ्यांना चित्रपट दाखविण्यासाठी घेऊन आलो. आदरणीय अशोकभाऊ, अतुलभाऊ व निशाभाभीजींसह संचालक मंडळांनी ही व्यवस्था उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानते.’
रश्मी लाहोटी, प्राचार्या, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल
‘छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र विद्यार्थ्यांना समजावे त्यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घ्यावी यासाठी अनुभूती स्कूलच्या व्यवस्थापनाने ‘छावा’ चित्रपटाची संधी उपलब्ध करुन दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद!’
मनिषा प्रशांत मल्हारा, इतिहास शिक्षिका, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल
‘छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास हा फक्त पुस्तकातून अभ्यासला होता. मात्र चित्रपटातून दोघंही महापुरूषांचे चरित्र अभ्यासता आले ही आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे.’
हर्षिता (विद्यार्थीनी इयत्ता ८ वी)
‘शंभूराजांच्या जीवनाविषयी अभ्यास करण्याची संधी चित्रपटातून उपलब्ध करुन दिली त्याबद्दल अनुभूती स्कूलच्या व्यवस्थापनाचे आभार व्यक्त करते.’
साक्षी देशमुख (विद्यार्थीनी इयत्ता ८ वी)
‘छावा चित्रपट बघितल्यानंतर शंभुराजांचे चरित्र समजले कितीही कठिण परिस्थीत आली तर न डगमगता लढत रहावे, तिच्या सामोरे जावे त्यासाठी घाबरु नये अशी शिकवण चित्रपटातून मिळाली.’
मनिष शर्मा (विद्यार्थी)