धरणगाव (प्रतिनिधी) येथील विस्तारीत भागासह संपूर्ण शहराच्या पाईपलाईनसाठी राज्य शासनाने सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून २७ कोटी ४४ लाख रूपयांच्या निधीला मंजुरी दिली असून याबाबतचा शासन निर्णय (जीआर) आज नगरविकास खात्यातर्फे जाहीर करण्यात आला आहे. तब्बल पाच दशकानंतर धरणगावातील जुन्या जलवाहिन्या बदलण्यात येणार असून यामुळे शहरात पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वात मोठा अडसर दुर झाला आहे.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची जलवाहिन्यांच्या कामांसाठी लवकरच निधी मिळणार असल्याची केलेली घोषणा या माध्यमातून प्रत्यक्षात उतरली आहे. तर. ना. गुलाबराव पाटील यांनी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांच्या माध्यमातून धरणगावच्या इतिहासातील या मोठ्या कामांना लवकरच प्रारंभ होणार असल्याचे प्रतिपादन केले आहे.
धरणगाव येथील पाणी पुरवठा योजनेतील सर्वात महत्वाचा टप्पा हा तब्बल सुमारे ५० वर्षे जुन्या असणार्या जलवाहिन्यांच्या ऐवजी नवीन पाईपलाईनची व्यवस्था करणे हाच होता. यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून या कामाला मंजुरी मिळविली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी याबाबतची घोषणा केली होती. तर राज्य शासनाने या कामासाठी २७ कोटी ४४ लाख रूपयांच्या निधीला मंजुरी दिली असून याबाबतचा जीआर अर्थात शासन निर्णय आज जाहीर केला आहे.
या शासन निर्णयाच्या अनुसार सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून धरणगाव शहरातील वाढीव परिसरासह संपूर्ण शहरातील जलवाहिन्यांसाठी २७ कोटी ४४ लाख रूपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. यातील २४ कोटी ४४ लाख रूपयांमध्ये शहरातील सुमारे ७५ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत. तसेच यात दोन पाण्याच्या टाक्या देखील उभारण्यात येणार आहेत. यात विद्युतनगर येथे पाच लाख लीटर क्षमतेची टाकी असेल तर जुन्या कोर्टाजवळ साडे तीन लाख लीटर क्षमतेची टाकी असणार आहे. दरम्यान, नवीन जलवाहिन्या टाकल्याने खराब होणार्या रस्त्यांच्या डागडुजीसाठी तीन कोटी रूपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
धरणगाव शहरातील महत्वाकांक्षी पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास येण्यासाठी जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलणे आवश्यक होते. या कामासाठी सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्ष सौ.कल्पना महाजन, गटनेते पप्पू भावे, जिल्हा न.पा. प्रशासन अधिकारी तथा धरणगावचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी पालकमंत्र्यांना प्रस्ताव दिला होता. याचा पाठपुरावा करून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी धरणगावकरांना दिलेल्या वचनाची पूर्तता केली असून या कामाला लवकरच प्रारंभ होणार आहे. दरम्यान, जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी पडणारा विजेचा भार कमी व्हावा यासाठी सोलर प्रकल्पाची तरतूद करण्यात आली असून यासाठी १ कोटी २६ लाख रूपयांचा निधी प्रदान करण्यात आला आहे.
दरम्यान, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील या संदर्भात म्हणाले की, धरणगावच्या जलवाहिन्यांसाठी तब्बल २७ कोटी ४४ लाख रूपयांचा निधी मंजूर होणे ही ऐतिहासीक बाब असून या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांची आपण धरणगावकरांच्या वतीने आभार मानत आहोत. शहरवासियांना आता नवीन पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून लवकरच पाणी मिळणार आहे.