मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील कुन्हा काकोडा येथील खरेदी उपकेंद्रातून २९ शेतकऱ्यांचा ३०० क्विंटल हरभरा खरेदी करून सुमारे ३० लाख ६२ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रफुल्लकुमार मुरलीधर पाटील (वय ३०) शासकीय हरभरा खरेदी उपकेंद्र चालक रा. कुन्हा यांनी येथील पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार बोदवड तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनी संचालक शिवाजी गोविंदा ढोले, रा. मनुर बुद्रुक, दीपक अनिल वराडे, रा. घानखेड, ता. बोदवड व खरेदी प्रमुख महा स्वराज्य फार्मर प्रोड्युसर कंपनी, रा.पंडित कॉलनी, नाशिक शुभम निकम या तिघांनी मार्च ते एप्रिल व मे मध्ये वेळोवेळी तसेच ६ एप्रिल रोजी कुन्हा काकोडा येथे हरभरा खरेदी उपकेंद्रात फसवणूक केली.
प्रति क्विंटल ५३३५ या दरानुसार शेतकऱ्यांकडून एकूण १६ लाख ५०० रुपयांच्या मालाची पावती गहाळ केली. तसेच तिघांनी बिल मंजुरीसाठी दिलेले ६० हजार रुपये व माझे प्रतिक्विंटल १०० रुपये, हमाली ५० रुपये व वाहतूक खर्च ५० रुपये असे एकूण २ लाख ७८ हजार ७०० रुपये असे एकूण ३० लाख ६२ हजार २९७ रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल झाला असून प्दुहील तपास पोउनि प्रदीप शेवाळे हे करत आहेत.