मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं गोवंडीत इमारतीचा भाग कोसळल्यानं ३ जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी आहेत. शुक्रवारी पहाटे ४. ५८ वाजता इमारतीचा भाग कोसळला आहे.
या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. फैजल कुरेशी (वय २१), नमरा कुरेशी (वय- १७), शाहिना कुरेशी ( वय- २६) अशी मृतांची नावं आहेत. गोवंडीतील शिवाजीनगर येथील बॉम्बे रुग्णालयाजवळ ही इमारत होती. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली सापडलेल्या ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ७ जणांना ढिगाऱ्याखालून वाचवण्यात यश आलं आहे. या ७ जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्यभरात पावसानं हाहाकार माजवला आहे. चिपळूण, खेडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर, रायगड, महाडमध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. रायगडमध्ये दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ५ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.