धरणगाव (प्रतिनिधी) ओला दुष्काळ जाहीर करून ५० टक्केच्या आत आणेवारी लावणे तसेच नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून हेक्टरी ३० हजार रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज धरणगाव तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात सततच्या पावसामुळे उडीद, मुंग, कांदा पूर्णपणे शेतकऱ्याच्या हातातून गेले तसेच ज्वारी व मका यांचे नुकसान झाले आहे. कापूस पिकावर लाल्या रोग पडला असून कपाशीच्या कैर्या कुजल्या आहेत. सततच्या पावसामुळे नगदी पिके पूर्ण शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहेत. कापूस पिकावर लाल्या रोग व झाडे उभाळणे सुरू असल्याने कापूस हे नगदी पीक पूर्ण हातचे गेले आहे. यंदा खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला असून धरणगाव तालुक्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून शासनाने पिकांचे पंचनामे करून ३० हजार रुपयांची मदत द्यावी, असे यात म्हटले आहे.