भंडारा (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील चिंचाळा येथील एका निवृत्त शिक्षकाला ४ लाख १४ हजार रुपयांना गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. एका अज्ञात भामट्याने एसबीआय बँकेतून बोलत असल्याची खोटी माहिती देऊन, केवायसी करण्याच्या नावाखाली शिक्षकाची ऑनलाइन फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बबन हरी मुन असं फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचं नाव आहे. फिर्यादी मुन हे भंडारा जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील चिंचाळा येथील रहिवासी आहे. त्यांचं पवनी येथील स्टेट बँक ऑफ इंडियात खातं आहे. या खात्यात त्यांची पेंशन जमा होतो. दरम्यान, एका अज्ञात भामट्याने मुन यांना फोन करत आपण एसबीआय बँकेतून बोलत असल्याची बतावणी केली. तसेच केवायसी करण्याबाबत भीती निर्माण केली. तसेच केवायसी फॉर्म भरायचा असल्यास खाते क्रमांक, एटीएम क्रमांक आणि आधार क्रमांक मागितला. यानंतर अज्ञातानं मुन यांच्या बँक खात्यातून ४ लाख १५ हजार ५९९ रुपयांची रक्कम काढून घेतली आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच मुन यांनी पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण भंडाऱ्यात सायबर सेलकडे वर्ग करण्यात आला असून पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.