जयपूर (वृत्तसंस्था) पुनर्जन्माची ही कहाणी तुम्हाला थक्क करेल. राजस्थानमधल्या नाथद्वारा येथील परावल गावात वास्तव्यास असलेल्या एका ४ वर्षीय मुलीने तिच्या पुनर्जन्माबद्दल केलेला दावा धक्कादायक आहे. मुलीच्या बोलण्याने आई-वडिलांपासून नातेवाईक आणि ग्रामस्थांपर्यंत सगळेच अवाक् झाले आहेत. ‘पहिल्या आयुष्यात तिचा मृत्यू केव्हा आणि कसा झाला, हे सर्व ती मुलगी सांगते.
४ वर्षांची किंजल वारंवार भावाला भेटण्यासाठी हट्ट करायची. एके दिवशी तिच्या आईनं वडिलांना बोलावण्यास सांगितलं. त्यावर वडील पिपलांत्री गावात असल्याचं किंजल म्हणाली. पिपलांत्री गावात ९ वर्षापूर्वी उषा नावाच्या महिलेचा जळून मृत्यू झाला. पिपलांत्री गाव परावलपासून ३० किलोमीटरवर आहे. वडील पिपलांत्री गावात असल्याचं किंजलनं सांगताच कुटुंबाला धक्का बसला. याबद्दल किंजलची आई दुर्गा यांनी अधिक विचारणा केली. त्यावर पिपलांत्री गावात आपलं कुटुंब राहतं. तिथे आई, वडील, भाऊ वास्तव्याला असतात, असं किंजलनं सांगितलं. ९ वर्षापूर्वी एका दुर्घटनेत माझा मृत्यू झाला. मी भाजले होते, असंही किंजलनं पुढे सांगितलं. त्यानंतर दुर्गा आणि तिच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली.
किंजलने सांगितलेला संपूर्ण घटनाक्रम दुर्गा यांनी पती रतन सिंह यांच्याकडे कथन केला. रतन सिंह किंजलला डॉक्टरांकडे घेवून गेले. मात्र, तिची प्रकृती सामान्य असल्याच त्यांनी सांगितलं. किंजल सातत्यान तिच्या कुटुंबाला भेटण्याचा हट्ट करू लागली. माझं माहेर पिपलांत्रीमध्ये आहे. सासर ओडनमध्ये असल्याचं तिनं सांगितलं.
किंजलची गोष्ट पिपलांत्रीत वास्तव्यास असलेल्या पंकजपर्यंत पोहोचली. त्यानं तातडीनं परावल गाठलं. पंकज उषाचा भाऊ आहे. पंकजला पाहताच किंजलच्या आनंदाला पारावार उरला नाही. पंकजनं त्याच्या मोबाईलमध्ये असलेला त्याच्या आईचा आणि उषाचा फोटो दाखवला. तो पाहून किंजल खूप रडली. १४ जानेवारीला किंजल तिच्या कुटुंबासह पिपलांत्रीला पोहोचली.
किंजल गावात अशा प्रकारे वावरत होती, जणू काही वर्षानुवर्षापासून ती तिथेच राहते. ज्या महिलांशी उषा संवाद साधायची, त्याच महिलांची किंजलनं विचारपूस केली. उषाची आई गीता यांना हे दृश्य पाहून अश्रू अनावर झाले. २०१३ मध्ये उषाचा मृत्यू झाला. स्वयंपाकघरात काम करत असताना ती भाजली. त्यात उषाचा मृत्यू झाला. उषाला दोन मुलं आहेत.