अंबाजोगाई (वृत्तसंस्था) मित्राची पोलीसमध्ये निवड झाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आयोजित केलेली पार्टी करून स्विफ्ट डिझायर कारमध्ये गावाकडे परतत असताना समोरून येणाऱ्या ट्रकला समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला. यात कारचा चुराडा झाल्याने तिघे जागीच ठार, तर एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील आंबासाखर कारखाना ते लातूररस्त्यावर असलेल्या वाघाळवाडीजवळ मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातातील मयत व जखमी सर्व कारेपूर (ता. रेणापूर, जि. लातूर) येथील आहेत.
कारेपूर येथील सहा तरुण आपल्या निवड झाल्यामुळे त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा येथे पार्टी करण्यासाठी आले होते. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ते मांजरसुंबा येथून आपल्या स्विफ्ट डिझायर कारमधून (एमएच-१४- एलएल-६७४९) कारेपूर या ठिकाणी जाण्यासाठी निघाले होते. त्यांची कार सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आंबासाखर कारखान्याजवळच असलेल्या वाघाळवाडी फाट्यावर आली असता समोरून येणाऱ्या ट्रकला (केए-५२-४२०१) जोराची धडक दिली.
हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा चुराडा झाला. अपघातात बालाजी शंकर माने (३०), फारुख बाबुमियाँ शेख (३०), दीपक दिलीप सावरे (३२) यांचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांपैकी ऋत्विक हनुमंत गायकवाड (३०) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुबारक सत्तार शेख (३४), अजित पाशुमिया शेख (३०) हे गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पडवळ, पोलीस कर्मचारी नाना राऊत व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी धाव घेतली. दरम्यान, या महामार्गावर आजपर्यंत अनेक अपघात झाले असून या महामागचेि चौपदरीकरण करण्याची मागणी पुढे येत आहे.