भुसावळ (प्रतिनिधी) येथील उद्योगपती तथा भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनोज बियाणी यांच्या मालकीची ४० लाख रूपयांनी भरलेली बॅग एम.जी ग्राऊंड ते मुंबई प्रवास दरम्यान चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, नगरसेवक मनोज बियाणी यांचे सहकारी २८ मार्च २०२२ रोजी भुसावळ येथून बॅगेत चाळीस लाख रूपये घेऊन संगीतम ट्रव्हल्स मधून मुंबई येथे निघाले होते. दरम्यान, संबंधीत व्यक्तीला झोप लागल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी ही बॅग लांबविली. या फिर्यादीनुसार मनोज बियाणी यांचे निकटवर्तीय संजय पुरूषोत्तम तिवारी (रा. मधु डेअरी समोर, विठ्ठल मंदिर वॉर्ड भुसावळ) हे संगीतम ट्रॅव्हलच्या एमएच०३ सीपी- ३४७७ क्रमांकाच्या लक्झरी गाडीतून पाचशेच्या नोटांनी भरलेली बॅग घेऊन निघाले होते. त्यांनी ही बॅग गाडीच्या डिक्कीत ठेवली होती. मात्र रात्री त्यांना झोप लागल्याने कुणीतरी अज्ञात चोरट्याने ही बॅग लंपास केली आहे. दरम्यान, या संदर्भात मनोज बियाणी यांनी काल भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार गुरनं २६२/ २०२२ भादंवि कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि मंगेश गोटला हे करीत आहेत.
















