प्रयागराज (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज जिल्ह्यात २ वर्षांच्या मुलीसह एकाच कुटुंबातील पाच जणांची त्यांच्या घरातच हत्या (five people dead) करण्यात आली. राम कुमार यादव (५५), त्यांची पत्नी कुसुम देवी (५२), मुलगी मनीषा (२५), सून सविता (२७) आणि नात मिनाक्षी (२) अशी मृतांची नावं आहेत.
दुसरी नात साक्षी (५) बचावली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. राम कुमार यादव यांचा मुलगा सुनील (३०) हा घटना घडली त्यावेळी घरी नव्हता, तो तपासात सहकार्य करत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रिपोर्टनुसार, वरिष्ठ पोलीस अधिकारी अजय कुमार यांनी सांगितले की, मृतदेहावरील जखमांच्या खुणा पाहता या पाचही जणांच्या डोक्यावर प्रहार केल्याचा अंदाज आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी सात पथके तयार करण्यात आली आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.
श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञही पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेले वरिष्ठ अधिकारी संजय कुमार खत्री म्हणाले की, यादव यांच्या घराला आग लागली म्हणून स्थानिक रहिवाशांनी आरडाओरडा केला. “पोलिसांना सुरुवातीला आग लागल्याची माहिती मिळाली होती. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. राम कुमार यादव आणि इतरांचे मृतदेह घरात आढळून आले. ज्या खोलीत आग लागली होती, त्या खोलीजवळ लहान मुलगी आणि तिच्या आईचे मृतदेह होते. राम कुमार यादव आणि त्यांची पत्नी बाहेर खाटेवर पडले होते. नंतर त्यांच्या मुलीचा मृतदेह सापडला. “आतापर्यंत पूर्ववैमनस्याचा कोणताही अँगल समोर आलेला नाही,” असे ते म्हणाले.
पोलीस आणि प्रशासकीय अधिकार्यांना स्थानिक रहिवाशांच्या रोषाचा सामना करावा लागला. स्थानिकांनी या प्रकरणात त्वरित कारवाईची मागणी केली. नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी शोक व्यक्त केला. नातेवाईक आक्रोश करत होते. अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. जिल्ह्यातील आणखी एका भीषण गुन्ह्याच्या अवघ्या आठवड्यानंतर ही घटना घडल्याने खळबळ माजली आहे.