मुंबई (वृत्तसंस्था) परमीबर सिंह यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अशात गावदेवी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी अतिरिक्त गृह सचिवांकडे तक्रार केल्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यामध्ये निलंबन न करण्यासाठी ५० लाख तर निलंबनानंतर पुन्हा सेवेत घेण्यासाठी परमबीर यांच्या नावे २ कोटींची मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप अनुप डांगे यांनी केला आहे.
अनुप डांगे यांनी २ फेब्रुवारी रोजी याबाबतची लेखी तक्रार अपर मुख्य गृहसचिवांकडे केली आहे. अनुप डांगे यांनी परमीबर सिंह यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे सध्या खळबळ उडाली आहे. यामुळे आता परमबीर सिंग अडचणी येण्याची शक्यता आहे. गावदेवी परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या डर्टी बन्स सोबो या पबवर २२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०१९ रोजी कारवाई केली होती. या कारवाई दरम्यान पबचा मालक जीतू नावलानी याने तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात असलेल्या परमबीर यांच्यासोबत ‘घरके रिलेशन है’ असे सांगून कारवाईस विरोध केला, असं अनुप डांगे यांनी सांगितलं आहे.