बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील मनुर बु ।। येथे दोन आठवड्यापूर्वी तीन तरुणांचे अपघाती निधन झाले होते. त्यात भागवत प्रल्हाद शेळके याचाही मृत्यू झाला होता. त्याचा गावातच छोटासा मंडपचा व्यवसाय होता. त्याला एक मुलगा दहावीत व मुलगी बारावीत आहे.
दोन महिन्यापुर्वी त्यांनी घर बांधकाम करण्यासाठी आसारी व सिमेंटसाठी भुसावळ रस्त्यावरील असलेल्या चेतना स्टीलवर बुक केले होते. त्याच्या अपघाती निधनामुळे परिवार पोरका झाला. चेतना स्टीलचे मालक संजय मोहन बडगुजर यांनी दोन महिन्या अगोदर भागवतने आसारी सिमेंटचे बुक करण्यासाठी दिलेले ५० हजार त्याच्या मनुर बु. येथे घरी जावुन भागवतचे वडील प्रल्हाद शेळके यांच्याकडे सुपुर्द केले. शेळके परिवाराचे अश्रु अनावर झाले व मुलाचे घर बांधण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. मात्र, त्याने दिलेले पैसे प्रामाणिकपणे परत आणून दिल्याबद्दल बडगुजर यांचे आभार मानले. या प्रामाणिकभावनेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.













