जालना (वृत्तसंस्था) निलंबन काळातील पगार बिल काढून दिल्याचा मोबदला तसेच बदली झालेल्या ठिकाणी सेवापुस्तिका व पगारपत्रक पाठविण्याकरिता ५५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या परतूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यासह फायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि.१०) रंगेहाथ पकडले. अभिषेक अशोक परदेशी (वय ३८, मुख्याधिकारी नगरपरिषद, परतूर) व अनिल वल्लभदास पारीख (वय ४८, प्रभारी स्थानक पर्यवेक्षक तथा फायरमन, परतूर), अशी लाच स्वीकारणाऱ्यांची नावे आहेत.
या वेळी विदेशी दारूच्या बॉटलचीही मागणी केल्याचे समोर आले. या प्रकरणातील तक्रारदार यांची परतूर नगरपरिषदेमधून बल्लारपूर नगरपरिषदेत बदली झाली आहे. परतूर पालिकेतील फायरमन अनिल वल्लभदास पारीख याने तक्रारदार याचे २०२३ मध्ये परतूर पालिकेत कार्यरत असताना निलंबन काळातील पगारबिल काढून दिले आहे. याचा मोबदला तसेच तक्रारदार यांची बदली झालेल्या ठिकाणी बल्लारपूर नगरपरिषद येथे सेवापुस्तिका व पगारपत्रक पाठविण्याकरिता अग्निशमन विभागाचा नील रिपोर्ट देण्यासाठी फायरमन पारीख याने ६० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ४० हजार रुपये स्वीकारण्याचे कबूल केले. मुख्याधिकारी अभिषेक परदेशी याने लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी फायमन पारीख यास प्रोत्साहन दिले.
दरम्यान, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत विभागाने लाचेच्या मागणीची पडताळणी करून सापळा लावला. फायरमन अनिल पारीख यास ५५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यालाही ताब्यात घेतले. संशयितांविरुध्द परतूर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.