मुक्ताईनगर (प्रतिनिधी) शहरातील कालिंका माता मंदिर मंदिराजवळील रोडवर दोन अज्ञात हल्लेखोरांनी एका तरुणाला मारहाण करून त्यांच्याकडून ६५ हजारांचा ऐवज लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
संदिप लक्ष्मण पाटील (वय-२४ धंदा,व्यापार रा. नरवेल ता. मुक्ताईनगर) हे दि. २४ रोजी हेनरवेल येथून बोदवड तहसिल कार्यालय येथे शेतीच्या कामासाठी भाची मोहिनी चौधरी हिला सोबत आपल्या दुचाकीवरून गेले होते. बोदवड येथून काम संपवून नरवेल येथे परत येत असतांना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कालिका माता मंदिराच्या गेट जवळ रोडवर भाची मोहिनी हिला मळमळ आल्याने संदीप पाटील यांनी दुचाकी थांबविली. भाची उलट्या करत असतांना पाठी मागून शेतातून दोन अज्ञात इसमांनी संदीप पाटील यांना फायटरने मारहाण केली. तसेच चाकूचा धाक दाखवून हातातील दोन अंगठी, ४ हजाराची रोकड, मोबाईल असा एकूण ६५ हजारांचा मोबाईल जबरीने लुटून नेला. या प्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. उनि प्रदिप शेवाळे हे करीत आहेत.