जळगाव (प्रतिनिधी) कोरोनापासून बचावासाठी कोरोना प्रतिबंधक लस महत्वपूर्ण असल्याने जिल्हा प्रशासनातर्फे नागरीकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ४५ हजार ९९१ लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर १ लाख ६५ हजार २९८ लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण ८ लाख ११ हजार २८९ लाभार्थ्यांना कोरोना लसीचे डोस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यातर्फे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारी, २०२१ रोजी कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला होता. शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या सत्रात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरु केले. त्यानंतर ५ फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ४५ वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले होते. १ एप्रिलपासून जिल्ह्यातील ४५ वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही खाजगी रुग्णालयातूनही नागरीकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तर १ मे ते ११ मेपर्यंत जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांचेही लसीकरण करण्यात आले. त्यानंतर २१ जूनपासून जिल्ह्यातील १८ वर्षापुढील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनापासून बचावासाठी लस महत्वपूर्ण असल्याने आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन नागरीकही स्वयंस्फुर्तीने मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी गर्दी करीत आहे.
कोरोना लसीकरणास नागरीकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे नागरीकांचे सहज व सुलभ लसीकरण व्हावे याकरीता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र कार्यरत करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्रामार्फत जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ४५ हजार ९९१ लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर १ लाख ६५ हजार २९८ लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण ८ लाख ११ हजार २८९ लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहे. यात शहरी भागातील ४ लाख ४३ हजार ८१८ तर ग्रामीण भागातील ३ लाख ६७ हजार ४७१ नागरीकांचा समावेश आहे.
तालुकानिहाय झालेले लसीकरण
जळगाव-२१७५४७, भुसावळ-९०००३, अमळनेर-४५१७८, चोपडा-४७३४१, पाचोरा-४११३५, भडगाव-२८२२५, धरणगाव-२६५१५, यावल-५६१४६, एरंडोल-२२३६८, जामनेर-५१५१३, रावेर-५०७१२, पारोळा-२९६८२, चाळीसगाव-६४५३७, मुक्ताईनगर-२६६४२, बोदवड-१५७४५ याप्रमाणे लसीचे डोस देण्यात आल्याचेही जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.