नाशिक ( प्रतिनिधी ) – बहुचर्चित संशयित भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या अश्लाघ्य कृत्यांचा भंडाफोड झाल्यानंतर राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. खरातसंबंधित विविध गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. या पथकाचे प्रमुख म्हणून पुणे येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या समादेशक तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, खरात याच्या मिरगाव येथील फार्महाऊसवर छापा टाकत पिस्तुल, वापरलेली काडतुसे तसेच महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
भविष्य पाहण्यासाठी बड्या -बड्या राजकीय हस्तींची उठबस असणाऱ्या कथित ज्योतिषी कॅप्टन ऊर्फ अशोक खरात यास युवतीवर अत्याचार केल्याच्या फिर्यादीवरून अटक करण्यात आली असून, संशयित खरातकडे लैंगिक शोषणाचे तब्बल ५८ व्हिडीओ असल्याचा दावा केला जात आहे. त्यापैकी काही व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून, या प्रकरणाचे गांभीर्य आणि याचे धागेदोरे नाशिकसह विविध जिल्ह्यांत पसरले असल्याने विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. कॅप्टन खरात याच्याविरोधात नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर जिल्ह्यात स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. या सर्व प्रकरणांचा तपास आता एकत्रितपणे एसआयटीमार्फत सुरू झाला आहे. पोलीस आयुक्तांना या प्रकरणाशी निगडित सर्व कागदपत्रे, तांत्रिक पुरावे आणि केस डायरी तत्काळ एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
काय आढळले छाप्यात ?
शहर गुन्हे शाखेच्या पथकाने खरात याच्या मिरगाव येथील फार्महाऊसवर बुधवारी रात्री उशिरा छापा टाकला. या धडक कारवाईत पोलिसांनी रोकडसह एक पिस्तुल, जिवंत काडतुसे आणि मालमत्तेशी संबंधित अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली आहेत.
शस्त्रसाठा: फार्महाऊसमध्ये एक पिस्तुल सापडले असून, त्यासोबत काही वापरलेली तर काही न वापरलेली (जिवंत) काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.मालमत्ता दस्तावेज खरात याच्या मालकीच्या विविध मालमत्तांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर संशयास्पद दस्तावेज पोलिसांना मिळाले आहेत.इतर पुरावे: बेकायदेशीर व्यवहारांशी संबंधित काही डायऱ्या आणि डिजिटल पुरावेही पोलिसांच्या ताब्यात असल्याचे समजते.
धक्कादायक ५८ व्हिडीओ!
खरातच्या काळ्या कारनामांचा पंचनामा करणारे ५८ वादग्रस्त व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणातील काही अत्यंत घृणास्पद व अश्लाध्य कथित व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांकडे दोन आठवड्यांपूर्वीच पोहोचली होती फाईल !
खरात प्रकरणाची फाईल दोन आठवड्यांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचती करण्यात आली होती. त्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार अत्यंत गोपनीयता चाळगत या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली. पोलिसांनी आधी फिल्डिंग लावत खरातच्या निवासस्थानाची झडती घेतली. तसे करताना चोर शिरले असल्याचा बहाणा करीत महत्त्वाचे धागेदोरे मिळवले व अखेरीस खरातच्या मुसक्या आवळल्या














