भुसावळ (प्रतिनिधी) शहर पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी सागर दिलीप देहाडे (वय ३२) यांचा सकाळी हृदयविकाराने मृत्यू झाला. सकाळी १०.४५ वाजता हजेरी आटोपताच त्यांच्या छातीत कळा निघायला सुरुवात झाली. याबाबत त्यांनी सहकाऱ्यांना माहिती दिली. नंतर त्यांना ट्रॉमा केअर सेंटर व तेथून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. पण, दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
जळगाव येथील रहिवासी असलेले सागर देहाडे हे गेल्या दीड वर्षापासून भुसावळ शहर पोलिस ठाण्यात कर्तव्यावर होते. पोलिस सेवेतील ही त्यांची पहिलीच नियुक्ती होती. अप-डाऊन करत असल्याने ते बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे कर्तव्यावर हजर झाले. पोलिस ठाण्याजवळ पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांनी सकाळी १०.४५ वाजता हजेरी घेतली. यानंतर छातीत दुखत असल्याचे सागर यांनी सहकाऱ्यांना सांगितले. यानंतर ते मागील गार्डरूमजवळ गेले.
तेथून काही सहकाऱ्यांनी त्यांना खासगी दवाखान्यात नेले. पोलिस निरीक्षक पडघन यांना माहिती दिली. यानंतर पोलिस वाहनातून सागरला तातडीने ट्रॉमा केअर सेंटरला हलवण्यात आले. पण, ईसीजी काढल्यानंतर डॉ. मयूर चौधरी यांनी सागरला जळगावला नेण्याचा सल्ला दिला. यानंतर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाकडे जाताना रस्त्यातच सागरचा मृत्यू झाला. याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, मयत सागरची कौटुंबिक स्थिती हलाखीची असून वडील व भाऊ मजुरीचे काम करतात.