चंद्रपूर (वृत्तसंस्था) वडिलोपार्जीत जमिनीच्या वादातून चुलत पुतण्याने हातपाय बांधून व गळा दाबून काकाची हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास ऐन पोळ्याच्या दिवशीच डोनी येथे घडली. अमृत बाजीराव अलाम (६०) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, काका हा वारंवार जादूटोणा करून मारण्याची भीती दाखवत असल्याच्या रागातून हा खून केल्याचे बोलले जात आहे. अमृत बाजीराव अलाम (६०) असे मृतकाचे, तर विजयपाल गोविंदराव अलाम (२४) असे आरोपी युवकाचे नाव आहे.
मूलपासून १५ किमी अंतरावर आदिवासीबहुल डोणी हे गाव आहे. मृतक अमृत बाजीराव अलाम आणि आरोपी विजयपाल गोविंदराव अलाम यांचे शेत एकेमकाला लागूनच आहे. दोन- तीन वर्षापूर्वी शेतीच्या वादामधून दोघांच्याही कुटुंबात भांडण झाले होते. या वादामुळे मृतक अमृत अलाम हा आरोपी विजयपाल अलाम याला नेहमी जादूटोणा करून तुला मारून टाकतो, अशी धमकी देत होता. त्यामुळे आरोपीला भीती निर्माण झाली होती. याच भीतीपोटी आरोपी विजयपाल अलाम याने संधी साधून अमृत अलाम याचा खून केला.
घटनेच्या दिवशी शुक्रवार, १५ सप्टेंबर रोजी अमृत बाजीराव अलाम नेहमीप्रमाणे सकाळी शेतावर जाऊन १० वाजता घरी परत आला. जेवण करून दुपारी ३ वाजताच्या दरम्यान लहान भाऊ भीमराव अलाम यांच्या घरी गेला व सायंकाळी ५ वाजता दरम्यान गावातील हनुमान मंदिरजवळ भरणारा बैल पोळा पाहून घरी परत गेला. सायंकाळी ७ वाजतानंतर चुलतभाऊ मंगरू अलाम याला फोन लावतो, असे सांगून मोबाइल घेऊन समाज मंदिराकडे गेला. ८ वाजून गेले तरी पती अमृत अलाम घरी परत आले नाही, या चिंतेत पत्नी अन्नपूर्णा असताना ८.३० वाजताच्यादरम्यान घराजवळ राहणारे मनोज देवीदास नैताम व विकास मधुकरला अमृत हा समाज मंदिराजवळ पडून असल्याचे त्यांना सांगितले.
पती पडून असल्याची माहिती मिळताच अन्नपूर्णा ही दीर भीमराव अलाम याला घेऊन समाज मंदिराकडे गेली तेव्हा पती अमृत हा समाज मंदिराच्या पायरीजवळ टेकून पडलेला दिसला. अमृतच्या चेहऱ्यावर मारल्याच्या जखमा व दुपट्टयाने दोघं हात पाठीमागे बांधलेले व त्याच दुपट्टयाने गळा आवळल्याचे दिसले. पोलिसांनी गावातील काही जणांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता विजयपाल गोविंदराव अलाम याने अमृत बाजीराव अलाम याचा जादूटोण्याच्या भीतीपोटी दुपट्टयाने आवळून खून केल्याचे कबूल केल्याचे कळते. दरम्यान, पोलिसांनी अवघ्या पाच तासांत आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबतचे वृत्त एका दैनिकाने दिले आहे.