बोदवड (प्रतिनिधी) : ‘मजबुती का नाम महात्मा गांधी’ हे पुस्तक म्हणजे महात्मा गांधींवर आजपर्यंत झालेल्या सर्व आक्षेपांचे तत्कालीन संदर्भ-पुरावे देऊन,साधार निराकरण करण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न आहे.असे प्रतिपादन वरिष्ठ पत्रकार तथा सर्वोदय मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते महेंद्र पाटील यांनी केले. ते बोदवड पत्रकार संघाच्या वतीने आयोजित “मजबुती का नाम महात्मा गांधी”या चंद्रकांत झटाले लिखित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. यासंदर्भात बोलतांना ते पुढे म्हणाले की,पुस्तक वाचून महात्मा गांधी हे मजबुरीचे नाव आहे की मजबुतीचे हे वाचकांनीच ठरवायचे आहे. महात्मा गांधींच्या विचारांची हत्या अद्याप कोणीही करू शकले नाही. त्यांचे विचार अजून जिवंतच आहेत. जगातील असे कुठलेही पाठ्यपुस्तक नाही की, ज्यामध्ये महात्मा गांधींबद्दल धडा नाही. कुठलेही असे विद्यापीठ नाही, जे महात्मा गांधींबद्दल विद्यार्थ्यांना धडे देत नाही. गांधींना मारणे शक्य नाही.असेही पाटील म्हणाले.
यावेळी स्वतः लेखक चंद्रकांत झटाले,यांच्यासह बोदवड पत्रकार संघाचे डॉ. पुरुषोत्तम गड्डम, निवृत्ती ढोले, संदीप वैष्णव , अमोल अमोदकर, गणेश पाटील, विनोद शिंदे, सुहास बारी, सचिन महाजन, विकास पाटील, नाना पाटील, गोपीचंद सुरवाडे, रवी मराठे, अर्जुन आसणे, तसेच अखिल भारतीय कुणबी महासंघ संस्थापक अध्यक्ष श्री शिवा पाटील गोंड,प्रदेश सचिव श्री प्रवीण कान्हे,संतोष खंडेराय, दीपक टिकार श्री गोपाल गोलाईत,हेमंत चौधरी,आदींची उपस्थिती होती. लेखक चंद्रकांत झटाले महाराष्ट्रात ‘संतांचे विद्रोही विचार’, ‘देश धर्मनिरपेक्ष हवा की धार्मिक’ ‘गांधी समज-गैरसमज’ ‘शिवरायांचा खरा हिंदू धर्म’ अशा अनेक विषयांवर व्याख्याने देतात. ते महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रबोधनकारी रोखठोक स्तंभलेखन करीत आहेत. गेल्या 18 वर्षांपासून विविध सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत.मागील ६ वर्षांपासून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा महानगर संघटक म्हणून काम करीत आहेत.