जालना (वृत्तसंस्था) परतूर गावातील शाळा खोली बांधकामाच्या ४ लाख रुपये बिलाच्या चेकवर सही करण्यासाठी ३२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सरपंच लाचेच्या सापळ्यात अडकल्याचा प्रकार परतूर तालुक्यातील रोहिणा गावातील आहे. जसाराम आसाराम कुंभारे असे लाचखोर सरपंचाचे नाव आहे.
तक्रारदारांनी शाळेच्या खोल्यांचे काम केलेले आहे. या बांधकामाच्या ४ लाख रुपयांच्या बिलाच्या चेकवर ग्रामसेवक आणि सरपंचांच्या सह्या आवश्यक होत्या. त्यापैकी ग्रामसेवक यांनी यापूर्वीच सह्या केलेल्या होत्या. परंतु सरपंच कुंभारे याने हे बिल काढण्यासाठी ८ टक्क्या प्रमाणे ३२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यात तक्रारदारांनी लाच न देता याबाबतची तक्रार जालना एसीबी पथकाकडे केली होती. यानंतर पथकाने 32 हजार रुपये लाच परतुर येथील पंचायत समितीसमोर पंचा समक्ष स्वीकारताना सरपंचला रंगेहात पकडले. याप्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई उपअधीक्षक बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाल एस. एस. शेख, जावेद शे देठे, प्रवीण खंदारे आदींनी केला आहे.