मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय लष्करात सुभेदारपदासाठी सकारात्मक वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी एका उमेदवाराकडून ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या नौदलाच्या एका अधिकाऱ्याला अटक करत त्याच्याविरोधात सीबीआयने मुंबईत गुन्हा दाखल केला आहे. संजू अर्लाकट्टी असे या नौदल अधिकाऱ्याचे नाव असून, तो नौदलाच्या अश्विनी रुग्णालयात कार्यरत आहे.
उपलब्ध माहितीनुसार, भारतीय लष्करातील भरतीसाठी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी मुंबईत भारतील नौदलाच्या आयएनएस अश्विनी या रुग्णालयात अलीकडेच झाली. यावेळी लष्कराच्या डॉक्टरांना संजू अर्लाकट्टी हा नौदलाचा अधिकारी साहाय्य करत होता. या प्रकरणातील तक्रारदार उमेदवाराची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने त्याला दुसऱ्या इमारतीमध्ये एका शौचालयामध्ये नेत, जर वैद्यकीय चाचणीमध्ये उत्तीर्ण असा अहवाल हवा असेल तर मला ३० हजार रुपये दे असे सांगितले.
संबंधित उमेदवाराने हे पैसे देण्यासाठी असमर्थता व्यक्त केली होती. मात्र, रात्रीपर्यंत विचार कर, मी तुला पुन्हा फोन करेन असे त्या अधिकाऱ्याने संबंधित उमेदवाराला सांगितले. त्याप्रमाणे अधिकाऱ्याने फोन केला व फोन-पेवर पैसे पाठविण्यास सांगितले. यानंतर त्या उमेदवाराने ही घटना लष्करी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. तसेच त्याच्या ओळखीच्या एका व्यक्तीला सांगितली. त्यांनी केलेल्या सूचनेनुसार याप्रकरणी सीबीआयमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर सीबीआयने सापळा रचत संशयित आरोपी अर्लाकट्टी याला अटक केली. याबाबतचे वृत्त आज ‘लोकमत’ ने दिले आहे.