नागपूर (वृत्तसंस्था) अनुदानित शाळेत प्रवेश घेण्यास फी लागत नसताना इयत्ता पाचवीत प्रवेशासाठी ९ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या जरीपटका येथील महात्मा गांधी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका आणि पर्यवेक्षिकेला रंगेहात अटक करण्यात आली. शनिवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ही कारवाई केली. डायना अलेक्झांडर अब्राहम (३६ रा. मार्टिननगर) आणि पर्यवेक्षिका रेखा हर्षवर्धन मोहिते (६२, रा. गायत्रीनगर, झिंगाबाई टाकळी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार महिलेच्या (वय ३८, रा. पाचपावली, नागपूर) मुलाला शासनमान्य शंभर टक्के अनुदानित शाळेत इयत्ता पाचवीमध्ये प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी त्यांनी सिंधू एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित जरीपटका येथील महात्मा गांधी इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न केला. त्यासाठी त्या संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिका डायना आणि पर्यवेक्षिका रेखा मोहिते यांना संस्थेच्या अनुदानित शाळेत प्रवेश देण्याचा अधिकार नसतानासुद्धा त्यांनी पाचवीत प्रवेश देण्यासाठी नऊ हजार रुपयांची लाच या तक्रारदार महिलेस मागितली. तक्रारदार महिलेला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी गुरुवारी (दि. १५) या प्रकरणाची ‘एसीबी’कडे तक्रार केली.
तक्रारीत तथ्य असल्याचे उघडकीस आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अधीक्षक राहुल माकणीकर, उपअधीक्षक महेश चाटे, उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक शिवशंकर खेडेकर, नितीन बलिगवार, हवालदार राम शास्त्रकार, करुणा सहारे, कांचन गुलबसे, अस्मिता मल्लेरवार, अमोल भक्त यांच्या पथकाने शाळेच्या कार्यालयाजवळ सापळा रचला. तक्रारदार महिलेने ९ हजार रुपये देण्याचे कबूल करून महात्मा गांधी इंग्लिश स्कूलच्या कार्यालयात पैसे देण्याचे ठरले. १७ जून रोजी तक्रारदार महिलेकडून पैसे घेत असताना अधिकाऱ्यांनी धाड टाकून आरोपी मुख्याध्यापिका डायना अलेक्झांडर अब्राहम व पर्यवेक्षिका रेखा हर्षवर्धन मोहिते यांना रंगेहात अटक केली