फैजपूर (प्रतिनिधी) पत्त्याच्या क्लबवर कारवाई न करण्यासाठी ४ हजाराची लाच मागणाऱ्या सहाय्यक फौजदारासह दोन पोलीस कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत वसंत सांगळे (वय-५२, रा. यावल रोड, फैजपूर) , पोलीस नाईक किरण अनिल चाटे (वय ४४, रा. विद्या नगर, फैजपूर), महेश ईश्वर वंजारी (वय ३८, रा. लक्ष्मी नगर, फैजपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार हे यावल तालुक्यातील रहिवाशी असून फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्यांच्या बामणोद येथील पत्त्याच्या क्लबवर कोणतीही कारवाई करू नये, यासाठी बामणोद बिटवरील पोलीस नाईक किरण अनिल चाटे, महेश ईश्वर वंजारी यांनी तक्रारदारकडून ४ हजाराची मागणी केली. परंतू तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी जळगाव लाचलुचपत विभागात तक्रार दिली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने शुक्रवारी २४ मार्च रोजी सापळा रचला. यावेळी तक्रारदारने सहाय्यक फौजदार हेमंत वसंत सांगळेशी भेट घेतली. त्यानुसार सहाय्यक फौजदार यांनी बिट कर्मचारी किरण चाटे यांच्याशी बोलणे करून ४ हजाराची लाच मागितली. त्यानुसार तक्रारदार यांनी ४ हजार रूपये रक्कम महेश वंजारी यांना देताच लाचलुचपत विभागाने दोघांना रंगेहात पकडले. सायंकाळी उशीरापर्यंत तिसऱ्या संशयित आरोपी किरण चाटे याला देखील पोलीसांनी ताब्यात घेतल्याचे कळतेय.
विभागाचे पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, सहायक फौजदार सुरेश पाटील, हे.कॉ.अशोक अहिरे, सुनिल पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, जनार्दन चौधरी, .किशोर महाजन, सुनिल वानखेडे, बाळु मराठे, प्रदीप पोळ, सचिन चाटे, अमोल सुर्यवंशी, प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली.