छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) गंगापूर शहरातील अहिल्यादेवीनगर येथे शुक्रवारी (दि. २५) सायंकाळी घरात झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्या बाळाचा रविवारी सकाळी ११ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. आर्यन राहुल राठोड (२ वर्षे ६ महिने) असे मृत झालेल्या बाळाचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत मुलाचा बाप आरोपी राहुल राठोडवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड येथील राहुल राठोड व त्याची पत्नी संगीता राठोड हे दाम्पत्य आपला अडीच वर्षीय मुलगा आर्यनसह शहरातील अहिल्यादेवीनगर येथे राहत होते. राहुल हा एका फायनान्स कंपनीत वसुली करण्याच्या कामावर आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता गावठी काट्याशी खेळताना खटका दबून कट्ट्यातून सुटलेली गोळी आर्यनच्या कपाळात घुसून तो गंभीर जखमी झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून जखमी बाळावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र शेवटी आज सकाळी ११ वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत बाळाचे वडील राहुल कल्याण राठोड यास गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पो.नि. सत्यजित ताईतवाले यांनी दिली. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने दिले आहे.