जळगाव (प्रतिनिधी) कर्नाटकमधील एका व्यापाऱ्याने ‘तुमच्यासोबत व्यापार करायचा आहे’ असे सांगून मनोज विष्णू रडे या हार्डवेअर व्यावसायिकाला साडेपाच लाखांचा चुना लावल्याची घटना समोर आली आहे. व्यावसायिकाने ६ लाख ९५ हजार रुपयांचा माल दिल्यानंतर, त्या व्यापाऱ्याने केवळ १ लाख ३८ हजार रुपये अदा केले. उर्वरित ५ लाख ५६ हजार रुपये न देता, त्या व्यापाऱ्याने फोन बंद करून कर्नाटकमध्ये पसार होण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी, मनोज रडे यांनी बुधवारी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पोलनपेठेमध्ये मनोज विष्णू रडे यांचे प्रभात हार्डवेअर अॅण्ड इलेक्ट्रीकल जनरल प्रा.लि. नावाचे दुकान आहे. येथे रबर आणि प्लॅस्टिकचे मोडलेड इंडस्ट्रीयल एक्सेसरीज व इन्शुलिटींग फिटींगची निर्मिती करून विक्री केले जाते. दरम्यान, जानेवारी २०२३ मध्ये लक्ष्मण शिवाप्पा असंगी नामक व्यक्ती त्यांच्या दुकानावर आल्यावर त्यांनी कर्नाटकातील बागलकोट येथे रामदास सिस्टीम इरिगेशन नावाचे त्यांचे शॉप असून तुमच्यासोबत मला व्यापार करायचा सांगून त्यांनी ६ लाख ९५ हजार २५१ रूपयांचा मालाची ऑर्डर दिली. त्यापोटी त्याने ४९ हजार ५०० रूपये रडे यांच्या खात्यावर पाठविले.
विश्वास संपादनामूळे माल पाठवला
कर्नाटकमध्ये नंतर दि. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी ५० हजार रूपये आणखी पाठवून कर्नाटकाच्या व्यापाऱ्याने रडे यांचा विश्वास संपादन केला. नंतर रडे यांना उर्वरित रक्कम ही पंधरा दिवसात पाठवेल असे त्यांने सांगितले. दि. १४ फेब्रुवारीला रडे यांनी संपूर्ण माल हा कर्नाटकात पाठविला.
शहर पोलिसात धाव घेत दिली तक्रार
अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यावसायिकाने अखेर बुधवारी शहर पोलिस ठाण्यात येवून संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. नंतर त्यांच्या फिर्यादीवरून लक्ष्मण शिवाप्पा असंगी याच्याविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैशांसाठी तगादा लावल्याने फोन केला बंद
असंगीकडे वारंवार पैशांचा तगादा लावल्यानंतर त्याने केवळ ३९ हजार रूपये पाठविले. नंतर पैसे पाठविण्यास त्याने टाळाटाळ केली. अखेर ५ लाख ५६ हजार रूपयांचा धनादेश पाठविला. पण, तोही एररमुळे वटला नाही. अखेर पैशांचा तगादा लावल्यानंतर व्यापाऱ्याने फोन बंद केले.