जळगाव (प्रतिनिधी) तालुका पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावरच रात्री फिरायला निघालेल्या कल्पना संजय पाटील (वय ५४, रा. खोटे नगर, निमखेडी शिवार, जळगाव) या महिलेल्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीची अडीच तोळ्याची सोन्याची पोत दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी लांबवली. ही घटना बुधवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील खोटेनगर परिसरात कल्पना पाटील हे कुटूंबासह वास्तव्याला आहेत. बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर ते शतपावली करण्यासाठी गेल्या होत्या. तालुका पोलीस ठाण्यासमोर पाण्याच्या टाकीजवळ चालत असताना एका काळ्या रंगाच्या दुचाकवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्याजवळ दुचाकी हळू केली, आणि काही कळण्याच्या आतच कल्पना पाटील यांच्या गळ्यातील मंगळसूत्र असलेली सोन्याची पोत तोडून तेथून चोरटे पसार झाले. दरम्यान, महिलेने आरडाओरड केली, मात्र चोरटे धुमस्टाईने तेथून पसार झाल्याने कोणाच्या हाती लागले नाही. महिलेने लागलीच पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेली आपबिती सांगितली. पोलिसांनीही लगेच या भागात चोरट्यांचा शोध घेत काही ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. रात्री उशिरा चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील तपास करीत आहेत.