मुंबई (वृत्तसंस्था) भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखलल झालेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ईडीच्या नोटीसविरोधात याचिका दाखल केली आहे. ईडीने अटकेची कारवाई करु नये यासाठी एकनाथ खडसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. यावर पुढील सुनावणी २५ जानेवारी रोजी होणार आहे.
माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची अलीकडेच ईडीने चौकशी केली होती. ईडीनं आपलं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं. त्यानुसार एकनाथ खडसेंना अटकेपासून दिलासा देण्यास ईडीचा विरोध आहे. एकनाथ खडसेंच्यावतीनं वकिलांनी युक्तीवाद केला. याबाबत आज कोर्टात सुनावणी झाल्यानंतर, याप्रकरणाची पुढील सुनावणी येत्या सोमवारी २५ जानेवारीला होणार आहे. एकनाथ खडसेंनी आपल्या याचिकेत ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे. तसंच या चौकशीची व्हिडिओग्राफी करण्याची मागणी या याचिकेत आहे. शिवाय तपासात सहकार्य करत असल्यानं कोणतीही कठोर कारवाई न करण्याची विनंती खडसेंनी केली आहे. यामुळे सोमवारी कोर्ट महत्वाचे आदेश देणार आहे.
पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्येची १५ जानेवारीला ईडीकडून सुमारे साडे सहातास चौकशी करण्यात आली. ईडीकडून आपल्यावर कोणताही दबाव टाकण्यात आला नाही. ईडीला जेव्हा जेव्हा गरज पडेल, तेव्हा तेव्हा त्यांना सर्व सहकार्य करण्यात येईल, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.