सोनगीर(प्रतिनिधी) – शिरपूरहून धुळ्याकडे भरधाव वेगाने येणारी चारचाकी सोनगीरजवळील रस्ता दुरूस्तीच्या कामासाठी उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता कि यात तीन जण जागीच ठार झाले. तर १० वर्षांच्या चिमुकलीसह तिघे जखमी झाले. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावर गव्हाणे फाट्याजवळ झाला.
सविस्तर माहिती अशी की, या अपघातात पांडुरंग धोडू महाजन (वय ५८ रा. बजरंग चौक सोनगीर), संदीप शिवाजी चव्हाण (वय ४३, रा. सिडको कॉलनी नाशिक) व हितेश चौधरी (वय ४० म्हससरुळ, जि.नाशिक) अशी मृतांची नावे अाहेत. नरडाणा गावापासून चार किलोमीटर अंतरावरील गव्हाणे फाट्यानजीक सद्भाव कंपनीचे कर्मचारी रस्ता दुरुस्तीचे काम करत होते. त्यांचे साहित्य असलेले ट्रॅक्टर महामार्गावर उभे होते. यावेळी शिरपूरकडून धुळ्याकडे जाणारी कार (क्र.एम.एच. ०२,डी.एस. १२७७) ही भरधाव ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर अादळली. कारचा वेग एवढा हाेता की ती ट्रॅक्टर ट्रॉलीच्या खाली जाऊन अडकली. या अपघातात रस्ता दुरुस्तीचे काम करणारे पांडुरंग महाजन हे जागीच ठार झाले. कारमधील संदीप चव्हाण, हितेश चौधरी हे कारच्या पुढील भागात अडकल्याने जागीच ठार झाले तर कारमधील साक्षी संदीप चव्हाण (वय १०) व इतर तिघी जण गंभीर जखमी झाले.