मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह दोघांविरोधात जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. चेंबूर येथील व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते ललित कुमार टेकचंदानी यांनी भुजबळांविरोधात चेंबूर पोलिसांकडे तक्रार केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह दोघांविरोधात कलम ५०६ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात सरस्वती पूजनाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. छगन भुजबळांचा त्या वादग्रस्त वक्तव्याचे दोन व्हिडिओ शेअर केल्यामुळे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, असेही तक्रारदार टेकचंदानी यांनी तक्रारीत सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. तक्रारीमध्ये टेकचंदानी यांनी सांगितले की, आपल्याला वेगवेगळ्या नंबरांवरून ”भुजबल साहब को मैसेज करता है, दुबई वालों को कहकर गोली मरवाता हूं तुझे”, अशा धमक्या देण्यात आल्या.
भुजबळांविरोधात गुन्हा दाखल होताच भाजप नेत्यांनी भुजबळांवर टीका केली आहे. भाजपचे अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी म्हटले आहे की, भुजबळ यांनी व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिली. भुजबळ यांची अंडरवर्ल्ड आणि पीएफआयशी काही लिंक्स आहेत का? याचाही तपास झाला पाहिजे. अशा देशविरोधी शक्तींवर वेळीच कारवाई व्हावी. तर मध्य मुंबईचे भाजप खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे की, चेंबूरचे व्यावसायिक ललित टेकचंदानी यांना धमक्या कोणी दिल्या? या धमक्यांना माजी मंत्र्यांचे समर्थन होते का? या सर्व प्रकरणाचा तपास झाला पाहिजे.