बोदवड (प्रतिनिधी) बोदवड नगरपंचायतीचा बनावट दाखला तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नंदलाल श्यामराव पडे (४८, रा. बस स्टॅन्डजवळ, बोदवड) असे या गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
नंदलाल पडे याने २३ मे २०१७ रोजी बोदवड नगरपंचायतीचे बनावट रबरी शिक्के बनविले. एवढेच नव्हे तर बोदवड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्या नावे ना हरकत – दाखलाही तयार केला. त्यासाठी बनावट जावक क्रमांकही टाकला. त्यावर मुख्याधिकाऱ्यांची बनावट सही केली. यानंतर ‘थर्ड आय’ नावाचे वृत्तपत्र सुरू करण्यासाठी दाखला मिळावा, यासाठी प्रांताधिकाऱ्यांकडे अर्ज केला.
प्रांताधिकाऱ्यांकडून हे प्रकरण पडताळणीसाठी बोदवड नगरपंचायतीकडे आले. त्यावेळी मुख्याधिकारी गजानन तायडे यांना संशय आल्याने त्यांनी चौकशी असता शिक्का आणि कागदपत्रांचा हा बनावट प्रकार उघडकीस आला. नगरपंचायतमधील लिपिक विजय नंदलाल अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पढे याच्याविरोधात बोदवड पोलिसात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव हे करत आहेत.