भुसावळ (प्रतिनिधी) येथील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमध्ये ऑक्सीजन सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला शासनाकडून थकीत पेमेंट मिळत नसल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची भेट घेतली होती. पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत पालकमंत्र्यांनी तातडीने ठेकेदाराचे थकीत बिल अदा करण्याच्या सूचना केल्या. पालकमंत्र्यांच्या दणक्यानंतर शुक्रवारी अखेर संबंधीत ठेकेदाराला थकीत बिलाचा धनादेश मिळाला.
शहरातील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून ऑक्सीजन सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला शासनाकडून थकीत पेमेंट मिळत नसल्याने त्या संदर्भात होणारी गैरसोय लक्षात घेता शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जळगावच्या अजिंठा रेस्ट हाऊसमध्ये पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत पालकमंत्र्यांनी तातडीने डीन नागोराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधून भुसावळात ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराचे तातडीने थकीत बिल अदा करण्याच्या सूचना केल्या होत्या. पालकमंत्र्यांच्या दणक्यानंतर शुक्रवारी अखेर संबंधीत ठेकेदाराला थकीत बिलाचा धनादेश मिळाला.
पालकमंत्री यांनी दिलेल्या आदेशानंतर तातडीने ठेकेदाराचे रखडलेले २ लाख १३ हजार ८४८ रुपयांचे बिल अदा करण्यासंदर्भात हालचाली सुरू करण्यात आल्या. ट्रामा केअर सेंटरला तारा एजन्सीचे तन्मय बेंडाळे यांच्याकडून ऑक्सीजनचा पुरवठा होत असला तरी त्यांचे बिल अडकले होते. या संदर्भात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. शुक्रवारी संबंधित ठेकेदाराला धनादेश मिळाल्याचे अॅड. निर्मल दायमा यांनी सांगितले.
दरम्यान, ठेकेदाराला धनादेश मिळण्याबाबत भाजपा वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नितु पाटील यांनीदेखील वरीष्ठ स्तरावर तक्रार करून आवाज उचलला होता. बुधवारी देखील त्यांनी या संदर्भात चव्हाण यांच्याशी चर्चा केली व ठेकेदाराशी संवाद साधून दिला.