धरणगाव (प्रतिनिधी) भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील जनजाती क्रांतिकारकांच्या कर्तुत्वाचा गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्याचा एक स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन चैत्राम पवार, अध्यक्ष, देवगिरी प्रांत कल्याण आश्रम यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधत देवगिरी कल्याण आश्रम धरणगाव यांनी आयोजित केलेल्या स्वातंत्र्य संग्रामातील अनामिक क्रांतिकारकांच्या माहितीचे प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.आर. एन. महाजन,अखिल भारतीय सदस्य गतिविधी रा.स्व.संघ तसेच प्रमुख अतिथी दिलीप दादा पाटील कबचौउमवि व्यवस्थापन परिषद सदस्य उपस्थित होते. पुढे ते असे म्हणाले की भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या या अग्निकुंडात अनेक जनजातीच्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. यात जनजातीच्या स्त्रियांही मागे नव्हत्या.त्यातून देशबांधवांचे स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले.भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास लिहिला गेला.त्यात जनजातीच्या क्रांतिकारकांची उपेक्षाच झाली. जनजातीच्या क्रांतिकारकांनी केलेला त्याग, प्रसंगी दाखवलेले धैर्य व चाणाक्षपणा वास्तविक अवर्णनीय आहे. अशा अप्रकाशित तेजस्वी जनजातीच्या क्रांतिकारकांच्या माहितीचे प्रदर्शन भरवून त्यांना समाजासमोर आणण्याचा आपला हा एक स्तुत्य उपक्रम आहे.
कार्यक्रमाची सुरुवात देवगिरी कल्याण आश्रमाच्या गीताने मीनाक्षी मालपुरे यांनी केले.तसेच भारतमाता. प्रभू श्रीरामचंद्र,जननायक बिरसा मुंडा, स्व.बाळासाहेब देशपांडे स्व.जगदेवरामजी उराव यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.आर.एन.महाजन यांनी जनजाती क्रांतिकारकांच्या गौरवशाली इतिहासाची माहिती स्वतःला प्रगत समजणाऱ्या समाजाने आधी करून घेण्याची आज गरज आहे असे अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दिलीपदादा पाटील यांनी जनजातीच्या क्रांतिकारकांचा इतिहास आपल्या पाठ्यपुस्तकातून तरुण पिढी समोर आला पाहिजे असे आपल्या मनोगतातून भावना व्यक्त केल्या.
यावेळी जनजातीचे जवळ- जवळ 55अप्रकाशित क्रांतीकारकांच्या माहितीचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. तसेच जनजातीची कु. सोनी बारेला हिने बारावी परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केल्याने तिचा सत्कार कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री.चैत्रामजी पवार यांनी केला.मा.आमदार राजूमामा भोळे यांनी आवर्जून या प्रदर्शनाला भेट देऊन आयोजकांचे विशेष कौतुक केले. धरणगाव व परिसरातील नागरिक, विविध शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक,डॉक्टर, बँकेचे कर्मचारी, विद्यार्थी, जळगाव,पारोळा,चोपडा, शेंदुर्णी येथील देवगिरी कल्याण आश्रमाचे पदाधिकारी व सदस्य असे एकूण ४०० लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पल्लवी शिंगाणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पितृभक्त यांनी केले. आभार प्रदर्शन अंकुश पाटील सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धरणगाव देवगिरी कल्याण आश्रमाच्या मनीषा माळी, कविता आहेराव, स्वाती चौधरी, मंजूषा पाटील, मीनाक्षी मालपुरे, नीलिमा येवले, प्रतिभा येवले, सोनुले, मानसी येवले, वैशाली पितृभक्त, कविता फुलपगार, डॉ.पंकजकुमार अमृतकर, अंकुश पाटील अनिल पाटील, ज्ञानेश्वर पारधी, सागर पाटील, चिन्मय पाटील, ओम फुलपगार ,आर्यन शिंगाणे, गणेश भाटिया, निलेश वाणी, ईच्छेश काबरा, भगवान कुंभार, पल्लवी शिंगाणे यांनी परिश्रम घेतले.