छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) नातेवाईकाकडे गेलेल्या मुलाच्या मृत्यूबाबत वडिलांनी संशय व्यक्त केल्यानंतर चक्क कब्रस्तानात दफन केलेला मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. शहजाद साले फरहान बिनहीलाबी (१९, रा. संजयनगर, हल्ली मुक्काम नारेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
१७ नोव्हेंबरला शहजाद घनसावंगीला त्याच्या आत्याच्या घरी गेलेला होता. तिथे त्याने स्वतःला चाकू मारून आत्महत्या केली, असे त्याच्या आतेमामाने शहजादचे वडील फरहान बिनहीलाबी यांना फोन करुन सांगितले व रात्रीच्या वेळी त्याचा मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथे आणून गंजेशहीदा मस्जिद येथील कब्रस्तानात दफनविधी उरकून घेतला होता.
दरम्यान, माझ्या मुलाने आत्महत्या केली नाही?, त्याचा खून झाला आहे, असा संशय शहजादच्या वडिलांनी व्यक्त केल्यानंतर घनसावंगी पोलीसांनी गुरुवारी (दि.२३) कब्रस्तानात जावून फॉरेनसिक पथकाच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. घटनेची माहिती मिळताच कब्रस्तान परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे जिन्सी पोलीस ठाण्यातून बंदोबस्तासाठी पोलिसांचा जास्त फौजफाटा मागविण्यात आला होता. सालेहच्या शरीरावर गंभीर व खोल जखमा आढळल्याने ही हत्याच असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. शवविच्छेद अहवालानंतरच आता सगळं स्पष्ट होणार आहे.