छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) भाऊ निवृत्त झाल्यानंतर पार्टी करून परतणाऱ्या एका मद्यधुंद सैनिकाने मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी असलेल्या छावणी पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण करणाऱ्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
जम्मू काश्मिरमधे भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या दीपक बबन गवई (३४ रा. निसर्ग कॉलनी पेठेनगर भावसिंगपुरा ) हा भावाच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी सुटीवर आला होता. हा कार्यक्रम आटोपून घरी जात असताना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भावसिंगपुरा येथील आंबेडकर चौकात निघालेल्या मिरवणुकीसाठी बुलेटवर आला.
यावेळी बंदोबस्तासाठी असलेले छावणी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पुंडलिक जगन्नाथ डाके यांनी त्याला मिरवणूक सुरू असल्याने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने जाण्याचा सल्ला दिला. मात्र त्याला नकार देत तो थेट मिरवणुकीतून बुलेट घालण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा डाके यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने गवळी याला बाजूला घेत समजावून सांगण्याचाही प्रयत्न केला. पण त्यालाही न जुमानता त्याने थेट डाके यांच्या हनुवटीवर जोरदार प्रहार केला. त्यामुळे नागरिकांनी तसेच पोलिसांनी त्याला पकडून ठेवले. त्याच्याविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास न्यायालयात हजर केले असता त्याची हसूल कारागृहात रवानगी केली.
दरम्यान, दीपकला पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी तत्काळ त्याला घाटीत नेत तपासणी केली. तपासणी केली असता तो दारु प्यायला असल्याचे समोर आले. यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली. बुधवारी त्यात विनयभंगाचे देखील कलम वाढवल्याचे त्यांनी सांगितले. दीपक पूँछ येथे नाईकपदी कर्तव्यावर आहे. भावाच्या सेवानिवृत्तीनिमित्त तो सुटीवर आला होता. या घटनेत डाके जबर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने दिले आहे.