धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव-जळगाव रोडवरील जीएस कॉटन जिनिंगजवळ गुरुवारी रात्री सायकलस्वाराला डंपरने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दत्तात्रय शंकर पाटील (वय 66) असे मयताचे नाव असून, ते जिनिंगमध्ये नाईट वॉचमन म्हणून कार्यरत होते. कामावर जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने त्यांना चिरडले.
अपघात होताच स्थानिक नागरिकांनी धाव घेत जखमी अवस्थेत पाटील यांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
नागरिकांचा अवैध वाळू वाहतुकीवर आरोप
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी अपघातास जबाबदार असलेला डंपर हा अवैध वाळू वाहतूक करणारा असल्याचा आरोप केला आहे. धरणगाव-जळगाव मार्गावर अनेक वाळू वाहतूक करणारे डंपर बेधडकपणे वाहतूक करतात. यामुळे या मार्गावर अपघात होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पवन देसले आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत केली. तसेच, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या अपघाताबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. फरार डंपर चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.